नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता आज देशभरातील शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील १० कोटी ९० लाख शेतकर्यांच्या खत्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी १ लाख २४ हजार शेतकर्यांच्या खात्यावर १४ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. मात्र, हे करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यातील तळागळातील शेतकर्यांची स्थिती जाणून घेतली होती. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसारच शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी हाच उद्देश ठेवून ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशात ८६ टक्के अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांची प्रगती झाली तरच देशाची आणि शेतीची प्रगती होणार असल्याचे कृषी मंत्री म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील १ कोटी ५ लाख शेतकर्यांना या निधीचा लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.