भुसावळ, प्रतिनिधी । दीपनगर सीएसआर संदर्भात एकत्रीत निविदा रद्द करुन स्वतंत्र निविदा प्रकाशित करणे, २०१२ मध्ये झालेल्या आंदोलनातील महिलांवरील गुन्हे रद्द करणे, पिंप्रीसेकम रेल्वे लाईनवर आश्वासनाप्रमाणे उड्डाण पूल उभारणी करणे आदींसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पिंप्रीसेकम संघर्ष समितीने गुरुवारी दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे दीपनगर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दीपनगर औष्णिक केंद्राने सीएसआर निधीची एकत्रीत निविदा प्रकाशित केली आहे. ही निविदा गावनिहाय स्वतंत्रपणे काढावी, २ बाय ५०० मेगावॅट प्रकल्पाच्या निर्मितीवेळी ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत लेखी आश्वासन देवूनही गुन्हे मागे घेतले नाहीत. ते मागे घ्यावेत. ३ सप्टेंबर २०१९ रोजी उर्जामंत्री यांच्या सोबत पिंप्रीसेकम येथील उड्डानपूल काम नवीन प्रकल्प काम सुरु होण्यापूर्वी सुरु होईल, असे आश्वासन देवूनही हे काम सुरु झाले नाही. दीपनगरातील बॉटम अॅश वाहतूक करण्यासाठी १६ किलोमिटर लांबीची पाईपलाइन आहे. ही पाईपलाइन अनेक ठिकाणी फुटून नदी, नाले प्रदूषीत झाले आहे. यामुळे शेतकर्यांचे शेती उत्पन्नही घटले आहे. यामुळे हा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी आश्वासन द्यावे यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पिंप्रीसेकम संघर्ष समितीने आंदोलनाची भुमिका घेतली आहे. मागण्यांबाबत महानिर्मिती प्रशासनाने दखल न घेतल्यास गुरुवारी संघर्ष समिती पिंप्रीसेकमचे अध्यक्ष रमाकांत भालेराव व संयुक्त प्रदूषण निमुर्लन संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष डी. सोनवणे यांनी प्रकल्पाच्या गेटसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.