पिंपळे गावात तब्बल २५ वर्षांनंतर परतली लालपरी !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावात २५ वर्षांनी पुन्हा एकदा लालपरीचे आगमन झाले. गावात पुन्हा बस आल्याने सारे ग्रामस्थ हरखून गेले होते. बससेवा सुरू झाल्याने पिंपळे येथून धरणगाव येथील शाळेत पायी जाणाऱ्या – येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबली आहे.

विद्यार्थी, शिक्षक ग्रामस्थ यांनी ‘लालपरी’चे स्वागत केले. राज्य परिवहन मंडळाने २५ वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण केली आहे. ही बस सकाळी दोनदा व सायंकाळी दोनदा धरणगावहून, पिंपळे, निशाणे, खर्दे, कामतवाडी, साळवा अशी धावणार आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावाची दोन हजार लोकसंख्या आहे. गावात साधारण १९९९ पर्यंत धरणगावहून बससेवा सुरू होती. मात्र त्यानंतर काही कारणास्तव ही बससेवा बंद झाली. त्यामुळे तब्बल २५ वर्षांपासून गावात बससेवा नव्हती. पिंपळेहून धरणगावकडे जाताना व पिंपळे गावात शाळेत येताना शिक्षक, विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता गावात बस आल्यामुळे दररोज येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांची व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. याआधी हे विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून शाळेत येत होते. बससेवा सुरू व्हावी म्हणून पिंपळे गावाच्या सरपंच सौ.कविता पाटील, किरण पाटील, प्रमोद पाटील यासह शिक्षक व ग्रामस्थांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

धरणगाव येथील शाळेत पायी जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, व एस टी आगार यांना निवेदन देखील देण्यात आले होते. याची दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने एस टी सुरू झाली. यावेळी ग्रामस्थांनी एसटी चालक व वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content