मुंबई (वृत्तसंस्था) सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातील वादळही नाही, पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. चोवीस तास ‘सबसे तेज’ स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त चि. पार्थ यांचे आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे एक पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. शिवाय काही सिनेनिर्मात्यांचीही चौकशी करावी असेही त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले. आताच त्यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ास शुभेच्छा देणारे पत्र पाठवून रामनामाचा जप केला. यावर निर्माण झालेले वादळ शांत झाल्यावर श्री. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, माझ्या नातवाच्या बोलण्यास किंमत देऊ नका, तो अपरिपक्व आहे!. पक्षाची धुरा सांभाळणाऱयांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत, असे सांगत शिवसेनेने शरद पवार यांची बाजू घेतली आहे. संपूर्ण पवार कुटुंब हे राजकारणातले तालेवार. हा तालेवारपणा अजित पवारांपर्यंत पोहोचला, पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल तर मोठा फटका बसतो. असे फटके अजित पवार यांनी राजकीय प्रवासात अनेकदा खाल्ले. त्यामुळे अजित पवार सावध झाले. सध्या अजितदादांचा त्यांच्या जिभेवर संयम आहे. सध्या मी तोलून मापून बोलतो असे अजित पवार जाहीरपणे सांगत असतात; पण चि. पार्थ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसादही उमटतात. अर्थात छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे चि. पार्थ हे ‘नवे’ आहेत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून वाद निर्माण होतात. शरद पवार यांनी या वादावर पाणीच ओतले, असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.


