पारोळा, प्रतिनिधी। तालुक्यात व शहरात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केली जात आहे. त्याकडे महसूल प्रशासनाचे सोयीचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या बाहेरून देखील अवैध वाळू ही शहरात येत आहे. अशाच एक वाळूचा एक ट्रक पारोळा पोलिसांनी पकडून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महसूल प्रशासन या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करीत नाही. आसा प्रश्न उपस्थित केला जात नाही.
तालुक्यातील बोरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक ही केली जात आहे. या बाबत अनेक तक्रारी संबंधित ग्रामस्थांकडून होत आहेत. तक्रार देऊनही वाळू व मुरूम वाहतुकीबाबत संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याचे आरोप हे ग्रामस्थांकडून व शहरवासीयांकडून होत आहेत. अशीच चोरटी वाळू वाहतूक करताना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास तांबे नगर जवळ एक ट्रक वाळू समवेत उभा होता. पोलिसांना संशय आल्याने ट्रकचालकाची चौकशी केली असता ट्रकमध्ये दोन ब्रास वाळू दिसून आली. चालकाला वाळू वाहतूक परवाना विचारला असता ट्रकचालकाने तो नसल्याचे सांगितले. परिणामी चोरटी वाळू वाहतूकचा प्रकार उघड झाला. पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक जगदीश नवल रायसिंग राहणार बांभोरी तालुका धरणगाव याविरुद्ध लॉक डाऊन सुरू व जिल्हा व तालुका बंदी असताना देखील चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात व तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीकडे शहर तलाठी व तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाचे लाखो रुपयाचे रोज नुकसान होत आहे. याबाबत सुज्ञ नागरिकांमधून चिंता व्यक्त केले जात आहे. तर वरिष्ठ अधिकारी याकडे कधी लक्ष घालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.