पारोळा येथे ट्रक चालकाचा खून करणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी ।  ट्रक चालकाच्या मोबाईलवरुन धुळ्यात आई, वडिलांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मित्राला फोन केला अन् तिथेच घात झाला. त्याच कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी पारोळा येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा केला. दोन दिवसात एकाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

शाकीर शहा अदमान शहा (२६, मुळ रा.धुळे ह.मु.रा.तांबापुरा, जळगाव) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मारेकरी निष्पन्न होऊन अटक झालेला असला तरी खुनाचे मूळ कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

पारोळाजवळ महामार्गाच्या नजीक करंजी शिवारात ८ आॅगस्टच्या पहाटे द्वारका मुखराम यादव (५०, रा.जऊळके, ता.दिंडोरी, जि.नाशिक) या ट्रक चालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला चाकू आढळून आल्याने यादव यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.

यादव हे ७ आॅगस्ट रोजी डाळ घेऊन ट्रकने (एम.एच.१५ इ.जी. ५६७१) जळगाव व पारोळ्यासाठी निघाले होते. दोघं ठिकाणी डाळ पोहचविल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी जळगाव एमआयडीसीतील ओम इंडस्ट्रीजमधून डाळीचे १२५ कट्टे घेऊन नाशिकसाठी परत निघाले होते. यावेळी ते ट्रक मालक तानाजी खंडेराव जोंधळे (४०, रा.जऊळके,ता. दिंडोरी, जि.नाशिक) यांच्या संपर्कात सायंकाळपर्यंत होते, मात्र नंतर त्यांचा संपर्कच बंद झाला होता. त्यामुळे मालक जोंधळे हे त्यांच्या शोधार्थ आले असता ८ आॅगस्ट रोजी पहाटे महामार्गाच्या लगत अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची माहिती मिळाली.

 घटनास्थळावर पाहणी केल्यावर ती व्यक्ती द्वारका यादव असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र घटनास्थळावर ट्रक व डाळ नव्हती. जोंधळे यांच्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

Protected Content