पारोळा प्रतिनिधी । कोरोना या महामारीच्या आजाराने संपूर्ण जगापुढे मोठे संकट उभे झाले आहे. याचा फटका तालुक्यातील कुंभार समाजावर झाला असून ऐन उन्हाळ्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूने राज्यासह देशात भयानक रूप धारण केले आहे. सर्वांचे जीवन या आजाराने असह्य झाले आहे. अनेक व्यवसायाबरोबरच पारंपरिक व्यवसायही प्रचंड अडचणीत सापडले आहेत. असाच एक हातावर पोट असलेला समाज म्हणजे कुंभार समाज. कुंभार समाजाची संख्या पारोळा तालुक्यात हजार ते पंधराशे दरम्यान आहे. कुंभार व्यवसायाला मोठा फटका ऐन उन्हाळ्यात बसला आहे.
मध्यमवर्गीयांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणाऱ्या माठाचे उत्पादन, वीट उत्पादन, देव-देवतांच्या मूर्तींची निर्मिती, सणासुदीच्या पणत्या व बोळकी इत्यादींच्या माध्यमातून कष्ट करून आपला उदरनिर्वाह या समाजाकडून चालवला जातो. या सर्व व्यवसायिकांच्या उत्पादन व व्यवसाय मार्च, एप्रिल व मे महिन्यातच तेजीत असतो. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे कुंभार समाजातील साठ ते सत्तर टक्के लोकांचे काम ठप्प असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.