पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत मांसांचे तुकडे व दारूच्या रिकाम्या बाटल्या !

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव येथील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत मांसाचे तुकडे व गावठी दारूच्या रिकाम्या प्लस्टिक पिशव्या टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून या विहिरीवरून होणार पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तात्काळ बंद केला आहे.

याबाबत वृत्त असे की, वडगाव येथील देविदास इंगळे याचा शेजार्‍याशी वाद झाला होता. त्यामुळे इंगळे याने वाद झालेल्या व्यक्तीचे बकरीचे पिल्लू चोरून कापून त्याची भाजी बनवली. उरलेले कातडे व इतर मांसाचे अवशेष ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकले होते. दरम्यान, बकरीचे पिल्लू दिसत नसल्याने इंगळे याच्यावर संशय आला. याबाबत इंगळेला विचारणा केली असता त्याने पिल्लू चोरून कापल्याचे सांगत पिल्लाची कातडी व उरलेले मांस पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकल्याचे सांगितले. या कृत्याबाबत गावात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्याला चांगलाच प्रसादही दिला.

दरम्यान, या घटनेची माहिती सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना समजताच या विहिरीवरून होणारा सार्वजनिक पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून तात्काळ बंद करण्यात आला आहे. रविवारी सकाळी टीसीएल पावडरने विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. विहिरीत इंगळे याने टाकलेले मांसाचे तुकडे, कातडी, व दारूच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहिर दूषित करणार्‍या देविदास इंगळे याच्याविरुद्ध ग्रामपंचायतीतर्फे निंभोरा पोलिसांत कारवाई करण्यासाठी तक्रार करण्यात आली असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Protected Content