
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईजवळच्या भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी अल्पवयीन चुलतभावाला महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगार न्यायमंडळाने आरोपीला दहा हजारांचा दंड आणि समाजसेवा करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी 28 ऑक्टोबरला भिवंडीतील सारवली गावातील कोनगाव भागात राहणारी पाच वर्षांची चिमुरडी घरातून बेपत्ता झाली होती. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन तिच्या चुलत भावाला ताब्यात घेण्यात आले होते. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात होता. दिवाळीनिमित्त फटाके नेण्याच्या बहाण्याने आरोपी भाऊ पीडित चिमुरडीला निर्जनस्थळी घेऊन गेला होता. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याने चिमुकलीची हत्या केली होती. मुख्य न्यायाधीश एच. वाय. कावळे यांनी 13 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला भादंवि कलम 302, 376 आणि 364 आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत दोषी ठरवले होते. आरोपीने घृणास्पद गुन्हा केला आहे. त्याला फक्त दंड लावून सोडले जाऊ शकत नाही. किशोरवयीन आरोपीला समाजाप्रती आपले दायित्व लक्षात येण्यासाठी समाजसेवाही करावी लागेल, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.