पाचोरा, प्रतिनिधी। येथील श्री बालाजी महाराज यांची रथाची यात्रा ही गेल्या १८६ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. परंतु यावर्षी श्री बालाजी महाराजांची रथयात्रेचे हे १८७ वे वर्ष असून कोरोना महामारीमुळे रात्रोत्सवाची परंपरा ही खंडीत झाली आहे.
शहरातील रथगल्ली येथे जागेवरच श्री बालाजी महाराज यांच्या रथाला फुल हारांनी सजवुन भालचंद्र निंबाजी पाटील व संगिता भालचंद्र पाटील या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. तसेच रथ हा दहा पाऊले ओढण्यात आला. यावेळी सर्व सयाजी पाटील परिवार, बालाजी मित्र मंडळ यांनी कामकाज पाहिले. यावर्षी होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व भाविकांचे श्री. बालाजी संस्थान, पाचोरा यांनी आभार मानले आहेत.
श्री बालाजी रथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
इ.स. १७७८ (शके १७००) या सुमारास दुष्काळ पडल्याने आणि पेंढारी व ठग यांचे लुटमार वाढल्याने लहु पाटील यांचे वंशज रामादादा पाटील व सदाभाऊ पाटील यांचे त्यावेळीचे नातेवाईक (देशमुख) पाटील यांच्याकडे पांचाळेश्वर (पाचोरा) येथे स्थायीक झाले. शामा पाटील दरवर्षी पंढरपुरच्या वारीस पायी जात असत. त्यांना पंढरपुरच्या चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या पात्रात हात घातले असता श्री. बालाजी महाराजांची स्वयंभु मुर्ती हाती लागली. त्यांनी परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने सदरची मुर्ती दिंडी सोबत टाळ – मृदुंगाच्या गजरात पाचोरा येथे आणली. शामा पाटील यांना मुलं – बाळ नव्हते. तेव्हा त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली त्याचा विनियोग सर्व भावांनी मोठ्या उत्साहाने सन – १८३३ (शके १९४४) मध्ये बालाजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी केली. सदरच्या प्रतिष्ठापनेसाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगांव राजा येथुन पंडित व महंत बोलाविण्यात आले होते. त्यावेळी १८२३ मध्ये बालाजी महाराजांची रथयात्रा सुरू झाली असून आजपावेतो परंपरागत पद्धतीने वर्षानुवर्षांपासून सांस्कृतिक, परंपरागत मुलये जोपासली जात आहेत.