पाचोऱ्यात रेल्वे पोलिसांचे माणुसकीचे दर्शन; धावत्या रेल्वेतून पडलेल्या महिलेचे वाचविले प्राण

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोऱ्यात रेल्वे पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत धावत्या रेल्वेतून पडलेल्या महिलेचे प्राण वाचवुन महिलेला तिच्या पतीस सोपविण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजुन २० मिनिटांपुर्वी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नं. २ जवळुन ०२७८० गोवा एक्सप्रेस ही गाडी जात असतांनाच एका महिलेचा तोल जावुन ती अचानक प्लॅटफॉर्म नं. २ वर कोसळली असता तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलाही बेशुद्ध अवस्थेत होती. यावेळी स्थानकावर सेवा बजावत असलेले जी. आर. पी. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्र्वर बोरुडे व पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी रुग्णवाहीका चालक बबलु मराठे व नदीम शेख यांच्या साहाय्याने तात्काळ गंभीर जखमी महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

यावेळी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, परिचारीका दुर्गा तेली हे प्रथोमोपचार करीत असतांना जी. आर. पी. यांना सदर महिले जवळ आधार कार्ड आढळुन आले. त्यावरुन सदर महिलाही लक्ष्मीदेवी रामकुमार होतमसिंग रा. मेहगांव, जि. भिंड (मध्य प्रदेश) हे सिद्ध झाले. तसेच आधार कार्डच्या मागील बाजुस एक मोबाईल नंबर लिहीलेला आढळुन आला. त्या क्रमांकावर फोन केल्यावर तो क्रमांक तिच्या पती रामकुमार होतमसिंग याचा असल्याने रामकुमार यास घटनेची माहिती देवुन त्यांना पाचोरा येथे येण्याचे सांगितले. ५ रोजी सकाळी रामकुमार होतमसिंग हे पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल झाले असता चाळीसगाव रेल्वे स्थानकाचे ए.पी. आय. रमेश जी. वावरे यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा जी. आर. पी. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्र्वर बोरुडे, पोलिस नाईक दिनेश पाटील, नागेश दंदी, महिला पोलिस कर्मचारी अंशु राऊत या टिमने शहानिशा करुन लक्ष्मीदेवी हिला पती रामकुमार होतमसिंग यांचे स्वाधीन केले. या घटनेमुळे पाचोरा रेल्वे पोलिसांचे माणुसकीचे दर्शन बघावयास मिळाले आहे. या टीमवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Protected Content