पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील बाजार समिती समोरील भारती ऍग्रो एजन्सीज एन्ड हार्डवेअर या दुकानास आज सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. यात सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे दुकानमालक जगदीश पाटील यांनी सांगितले असून आगीत सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकानाचे मालक जगदीश पाटील हे नेहमी प्रमाणे सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी येत असतात. दि १२ रोजी त्यांनी कुलूप उघडून शटर वर करीत असताना त्यांना दुकानातून अचानक धूर येताना निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारील व्यावसायिकांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दलाचे वाहन जाणे इतपत रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी एक इंची पाईप लावून आग आटोक्यात आणली. तर काही कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी दुकानातील सामान बाहेर काढण्यास मदत केल्याने मोठा अनर्थ टळला. दुकानातील पाईप , वायर व इतर प्लास्टिक व फायबरचे वस्तू जळाल्याने सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.