पाचोरा, प्रतिनिधी । येथील युवा रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांना नुकताच “मॅजिक बुक रेकॉर्ड दिल्ली” यांच्याकडून दिला जाणारा “बेस्ट यंग एचीव्हर अवॉर्ड (पुरस्कार) २०२१ हा त्यांच्या रांगोळी कलेच्या सन्मानार्थ युवा रांगोळी कलाकार म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
शैलेश कुलकर्णी यांनी नुकतीच आपल्या सहकाऱ्यांसोबत थेट महाराष्ट्र राज्याबाहेर जाऊन तेलंगणा येथे ६० बाय ४० फुटाच्या आकाराची भव्य अशी पोट्रेट रांगोळी काढली होती तसेच आतापर्यंत एकल तसेच समूह रांगोळी कलेमध्ये त्यांनी १०० च्या वर पोट्रेट, अनामोर्फिक, थ्री डी विविध प्रकारच्या रांगोळी कला साकारल्या असून त्यामध्ये थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताची गान कोकिळा लता मंगेशकर तसेच विविध थोर पुरुष व सामाजिक विषयांचा समावेश आहे. युवा रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळी कलेतून आपले नाव घडविले आहे. त्यांना आतापर्यंत बरेच राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय बक्षिसे मिळाली असून या पुरस्काराने आपल्याला कलेतून करत असणाऱ्या सेवेमध्ये अजून प्रेरणा मिळेल व तसेच या पुरस्कारा मागे मला नेहमीच कलारसिक म्हणून साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अशीच कलेची सेवा निरंतर करत राहील व पाचोरा तालुक्याचे नाव कलाक्षेत्रात वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.