पाचोरा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रम

पाचोरा, प्रतिनिधी । उच्च न्यायालय मुंबई, यांच्या निर्देशानुसार पाचोरा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात असून यात मराठी भाषाविषयक कार्यक्रम घेण्यात आला.

पाचोरा येथील न्यायालयात दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ जानेवारी रोजी मराठी भाषा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायदंडाधिकारी एम. एच. हक हे होते. या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण पाटील, सरकारी वकील अनिल पाटील, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रजनी देशमुख कला, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय भडगाव येथील प्रा. डॉ. अतुल देशमुख हे होते. प्रा. देशमुख यांनी मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले.

भाषा म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. भाषा हे केवळ आपल्या संवादाचे, व्यवहाराचे माध्यम नाही तर ते आपली संस्कृति, इतिहास आणि अस्मितेचे प्रतीक असते, असे नमूद करीत प्रा. देशमुख म्हणाले की, मराठी भाषा प्राचीन असून तिला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. यावेळी त्यांनी काही मनोरंजनात्मक उदाहरण सुद्धा दिली. आज जगातील प्रगत देशांनी आपल्या मातृभाषेला पुढे नेले आहे. तेव्हा आपण सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्याच्या तसेच आपल्या दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत करण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक अ‍ॅड. एस. पी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार अ‍ॅड. सोनवणे यांनी केले. यावेळी जेष्ठ वकील सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक अधीक्षक अ. रा. पाटील, विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक बी. एम. भोसले, डी. के. तायडे, न्यायालयीन कर्मचारी, वकील मंच सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Protected Content