पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनपूर्तीसाठी ग्रामविकास पॅनलने पुढाकार घेतला असून ६ महिन्यातच आपल्या कामाची चुणूक दाखवून विविध विकास कामे हाती घेतली आहेत. यावेळी आदर्श गाव बनविण्याचा मनोदय सरपंच सावित्रीबाई गढरी यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामविकास पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जि. प. मराठी शाळा डिजिटल करणे, दलितवस्ती सुधार योजना, गावात काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा या सारखे अनेक विकास मुद्दे मांडले होते. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामविकास पॅनलला स्पष्ट बहुमत दिले. व त्यानंतर महिला आरक्षण निघाले व दि. १५ फेब्रुवारी २१ रोजी सावित्रीबाई गढरी ह्या आखतवाडे गावच्या सरपंचपदी तर उपसरपंचपदी आनंदसिंग गढरी विराजमान झाले. त्यानंतर ग्रामविकास पॅनलने विकास कामांना प्राधान्य देत गावदरवाजा जवळ पेव्हर ब्लॉक बसवणे, अनेक वर्ष्यापासून बंद अवस्थेत असलेली पाण्याची टाकी अथक परिश्रम केल्यानंतर सुरू करून गावात २४ तास पाणी उपलब्ध करून दिले. तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे अंत्यत घाणीचे साम्राज्य होते तेथे पेव्हर ब्लॉक बसवणे, गावात ठिक ठिकाणी कचराकुंडी ठेवणे, मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पहिले ते सातवी पर्यंत अभ्यासक्रम देणे, गावातील तिन्ही अंगणवाडीत खुर्ची, टेबल, फॅन व अॅक्वा गार्ड देणे, गावात धूर फवारणी मशीन देणे व अनेक वर्षांपासून महिला उघड्यावर शोचालयास बसत होत्या याची लवकरच दखल घेऊन मागील दोन दिवसांपूर्वी महिला सार्वजनिक शोचालयाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. ह्या सर्व विकासक कामांमुळे ग्रामस्थांनी व महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ह्या कामी ग्रामसेवक शरद पाटील व सर्व सदस्य व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे. नक्कीच लवकरच आखतवाडे ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिकास येईल असे मत सरपंच सावित्रीबाई गढरी यांनी बोलून दाखविले.