चंदीगड वृत्तसंस्था | पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या साडेचार वर्षाच्या कालखंडात अरूसा आलम ही पाकिस्तानी महिला त्यांच्या शासकीय बंगल्यात वास्तव्याला होती अशी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे अमरिंदर यांची चौकशी होण्याचे संकेत मिळाले आहेत.
अमरिंदर सिंह हे पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम हिच्यामुळे अडचणीत आले आहेत. सिंग मुख्यमंत्री असताना शासकीय निवासस्थानी साडेचार वर्षे राहिल्याने त्या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. अरुसा आलम यांच्या आयएसआय कनेक्शनची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी जाहीर केले आहे.
पोलीस महासंचालक इकबालप्रीत सहोता यांना तसे निर्देशही देण्यात आले आहेत. अरुसा यांच्याविषयी आतापर्यंतच्या प्राथमिक चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यांची सखोल चौकशी राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग यांनी सांगितले.