पहूर येथे पारावरच्या शाळेत विद्यार्थी रमले अभ्यासात (व्हिडीओ)

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रल्हाद वानखेडे यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या पारावरच्या शाळेला दिलेल्या भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शाळा बाहेरची शाळा’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातर्फे लेले नगर येथील हनुमान मंदिराच्या पारावर मोफत मार्गदर्शन वर्ग भरविण्यात येत आहे. त्यात शाळेचे उपक्रमशील शिक्षक शंकर भामेरे हे इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करत आहेत. या वर्गाला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन, तोंडाला मास्क किंवा हात रुमाल तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे.

आज या वर्गास सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी प्रल्हाद वानखेडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेणे गरजेचे असते, अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्राप्त करावे. प्रारंभी शंकर भामेरे यांनी त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. पारावरच्या शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध कृतीबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

उपक्रमास महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, केंद्र प्रमुख भानुदास तायडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.व्ही. घोंगडे, शिक्षक हरीभाऊ राऊत, राजेंद्र सोनवणे, हनुमान मंदिर लेलेनगर, ट्रस्टचे पदाधिकारी विजय बनकर, दीपक जाधव, निलेश चौधरी यांच्यासह आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content