पहूर येथे जादूटोणाविरोधी व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे मार्गदर्शन

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबत प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यशाळा रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आली.

 

प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक संजय बनसोड, अंनिसचे  जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी व अशोक तायडे, जामनेर शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे,  प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे उपस्थित होते.

 

मान्यवरांनी केले मार्गदर्शन

वाळीत टाकलेल्या,  बहिष्कार घातलेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी व जात पंचायत भरवून अन्याय करणाऱ्या पंचांना धडा शिकवण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे मोठा आधार मिळाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जामनेर शाखेचे कायदा व्यवस्थापन विभाग प्रमुख अँड. राजेंद्र मोगरे यांनी केले. तर श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण तसेच अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा थांबवण्यासाठी जादूटोणाविरोधी कायद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला, अशी माहिती जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी दिली.

 

प्रस्तावनेमधून कार्यशाळेचा उद्देश भीमराव दाभाडे यांनी स्पष्ट केला. यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मंत्राने नारळ पेटवणे,  नारळातून करणी काढणे आदि चमत्कार दाखवून त्याच्यामागील विज्ञान स्पष्ट केले.

 

कार्यशाळेत ‘जादूटोणाविरोधी कायदा’  याविषयी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की,अंनिसने  १८ वर्षांच्या दीर्घ संघर्षातून तसेच डॉ. दाभोलकर यांच्या बलिदाननंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित करण्यात समितीला यश मिळाले. या कायद्यामुळे नरबळी देणं, दैवी शक्ती व गुप्तधनाच्या नावाखाली कोणी फसवणूक करत असेल, लैंगिक शोषण करीत असेल, साप चावल्यावर डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे नेत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो.

 

त्यासाठी आता कायदा मजबूत झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. श्रद्धेच्या नावाखाली चालणारे व देवाधर्माचा वापर करून मानसिक, आर्थिक, शारीरिक शोषण करणाऱ्या बाबा-बुवा, अम्मा-माता अशांवर आता थेट कायदेशीर कारवाई करता येते, असेही त्यांनी सांगितले.

 

‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ याविषयी अँड. राजू मोगरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  अनेक जात व्यवस्थांनी त्यांच्या पंचायती बसवून समाजातील नागरिकांचे शोषण करणे, त्यांना वाळीत टाकणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न करून घेणे, दैनंदिन व्यवहारावर बंदी घालणे अशा विघातक गोष्टी केल्या तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. समितीने हे दोन कायदे राज्य सरकारकडून पारित केल्याने महाराष्ट्रातील शोषित होत असलेल्या जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 

नागरिक आता थेट पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकतात. दोषींवर गुन्हे दाखल करू होतात. नागरिकांना कायद्याचं संरक्षण मिळाले, अशी माहितीही यावेळी मोगरे यांनी दिली.

 

आभार सहदेव निकम यांनी मानले. सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत, कॉन्स्टेबल रवींद्र मोरे,  गोपाळ गायकवाड, ईश्वर कोकणे यांच्यासह अंनिसचे जामनेर प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, ऋषिकेश शिंदे यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील ३४ गावांचे पोलीस पाटील, पोलीस स्टेशन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content