पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे रात्री आलेल्या अहवालानुसार ६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथे आजपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.
रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये पहूर पेठ येथील २ महिला तसेच पहूर कसबे येथील बाधित भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या संपर्कातील ३ महिला व १ पुरुष अशा एकूण ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉक्टर हर्षल चांदा आणि वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पहूर येथील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजवरच्या रूग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाची सामाजिक साखळी खंडित होणे गरजेचे असून त्यासाठी आजपासून आयोजित पाच दिवसीय जनता कर्फ्यूला गावकर्यांनी शंभर टक्के यशस्वी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.