पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील वाघुर नदी तीरावर सार्वजनिक स्मशानभूमीलगत होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले घंटानाद आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , वाघुर नदीच्या तीरावर पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीलगत शेजारील शेतकर्याकडून अतिक्रमण होत असल्यामुळे सदर अतिक्रमण काढण्यात यावे , या मागणीसाठी वाघूर विकास आघाडी आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालया शेजारी घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते.
या संदर्भात मंगळवारी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीची पाहणी करून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे पत्र दिले होते. मात्र तरीही आंदोलकांनी तिसर्या दिवशी आंदोलन सुरू ठेवले होते.
बुधवारी लोकसहभागातून बारा हजार रुपयांची जागा मोजणी साठीचे चलन भरण्यात आले असून भूमापन विभागातर्फे लवकरच संबंधित जागेची मोजणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, आंदोलक सुकलाल बारी आणि शिवसेनेचे गणेश पांढरे यांनी आपली भूमिका मांडली . शांततेच्या मार्गाने अतिक्रमण काढण्याचा प्रश्न सुटावा यासाठी संबंधित अधिकार्यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी आंदोलकांनी केली असून तूर्तास तिसर्या दिवशी आज आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले..