पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असतांना येथील कोतवाल भानुदास श्रीपत वानखेडे यांच्यावर वीट भिरकावण्यात आल्याची घटना येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील कोतवाल भानुदास श्रीपत वानखेडे हे महावीर पब्लीक स्कूल येथे कोरोना संशयीत रुग्णांच्या व्यवस्थेकामी गेले असता तेथे जमलेल्या जमावातून एका व्यक्तीने त्यांच्यावर वीट भिरकविली . संबधितांवर कारवाई करण्याची मागणी कोतवाल भानुदास वानखेडे यांनी केली आहे.
सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना अनेक योध्दे हे याच्या प्रतिकारासाठी कार्यरत आहेत. यात गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी व कोतवाल यांच्यापासून ते आरोग्य, महसूल, पोलीस कमचार्यांचा महत्वाचा वाटा आहे. याच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी कर्तव्य बजावत असलेल्या वानखेडे यांच्यावर ज्या समाजकंटकाने वीट भिरकावली त्याचा तपास करून संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.