पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – सरसंघचालक

 

नागपूर : वृत्तसंस्था । “पहिली लाट आल्यानंतर आपण गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. पण न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी हवी”, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ऑनलाईन व्याख्यानात   ते बोलत होते.

 

 

 

जगभरात  परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला  दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस   मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी  जनतेला आवाहन केलं आहे.  देशावर ओढवलेल्या  संकटाविषयी त्यांनी  भूमिका मांडली.

 

आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल, असं मोहन भागवत म्हणाले. “जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत”, असं ते म्हणाले.

 

यावेळी मोहन भागवत यां सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

Protected Content