जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल, रावेर तालुक्यात जनावरांना सध्या लंम्पि स्किन डिसीज जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर दुध संघाचे प्रशासक मंडळाचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या आजारावर उपाय योजना राबविण्याबाबत दूध संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जनावरांच्या लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुध संघात आयोजित बैठकीत प्रशासक मंडळातील संचालक अरविंद देशमुख, अजय भोळे, अमोल शिंदे, व्यवस्थापक लिमये यांच्या सह कृत्रिम रेतन कर्मचारी तसेच विस्तार पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. या बैठकीत गुरांना होणाऱ्या आजाराबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीत आ.मंगेश चव्हाण यांनी लंम्पि स्किन डिसीज या आजाराची इतर गुरांना लागण होऊ नये याकरिता गुरांचे लसीकरण करण्यात येईल असे आश्वस्त केले. गुरांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी, पशु दुग्ध संवर्धन आयुक्त यांच्याशी आ. चव्हाण यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. दरम्यान, आ. गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार उद्या ३० ते ४० हजार लसींची मात्रा उपलब्ध होणार आहे. जर शासनाकडून लसींची मात्रा उपलब्ध होत नसेल तर दूध संघाचे मुख्य प्रशासक म्हणून लस उपलब्ध करून देईल असे अश्वासन त्यांनी बैठकीत दिले. पशुधनाचे शेतकरी वर्षानुवर्षे सांभाळत करीत असतो. परंतु, आजार आल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान व्हायला नको आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कोलमडायला नकोयाकरिता वैद्यकीय पथक नेमून आठवड्याभरात लसीकरणाच्या नियोजनाबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकातील सदस्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार असून सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले आहे.