परीक्षा पुढे ढकलल्याने टोपेंनी मागितली माफी; फडणविसांचे गंभीर आरोप

मुंबई प्रतिनिधी | आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर माफी मागितली आहे. तर याच प्रकरणावरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडत दलाल घुसल्यामुळे परीक्षा रद्द झाल्याचा गंभीर आरोप  केला आहे.

 

राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र रात्री उशीरा ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झाला. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांशी झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परीक्षा नियोजित पद्धतीने होणार, परीक्षा लांबणीवर पडली आहे, न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली, या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे ५, १० ते १५ लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Protected Content