बुलडाणा, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. सानुग्रह अनुदानासाठी रिक्षा चालकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर उद्योगधंदे तसेच इतर व्यवसाय बंद झाल्यामुळे राज्य सरकारने व्यवसायिक, व्यापारी तसेच रिक्षा चाकल यांना मदत म्हणून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यामध्ये सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून याच्या लाभासाठी सर्व परवाना रिक्षाधारकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सानुग्रह अनुदानासाठी रिक्षा चालकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवश्यक आहे. अर्ज पडताळणी करुन चालकांच्या खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. या करीता रिक्षाचालकांना http:transport.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परवाना धारकरिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी त्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. या जोडणीची सुविधा आर. टी. ओ. कार्यालय, बुलडाणा येथे उपलब्ध केली आहे. तसेच परवानाधारक रिक्षा चालकांनी त्यांचे आधार कार्ड त्यांचा बँक खात्याशी जोडणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करतांना आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर otp क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन अर्जात त्याचा वाहक क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमाक नोंद करावा. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालय अर्जातील नमुद तपशिल कार्यालयातील अभिलेखाशी पडताळून सत्यता तपासल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंजूर करुन अर्जदाराच्या बँक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने कार्यालयात उपस्थित राहणाची आवश्यकता नाही. तसेच सर्व परवानाधारक रिक्षा चालकांनी ऑनलाईन पध्दतीने सानुग्रह अनुदान मिळण्याकरीता अर्ज सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.