पबजी लवकरच नव्या रुपात भारतात परतणार

 

 

मुंबई:वृत्तसंस्था । पबजी मोबाईल भारतात परत येणार आहे. भारतात पुन्हा येणाऱ्या पबजीमध्ये चिनी कंपनीची कोणतीही भागिदारी नसेल, हेदेखील पबजी कॉर्पोरेशननं स्पष्ट केलं आहे.

भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती पबजी कॉर्पोरेशननं दिली. पबजी कॉर्पोरेशननं माध्यमांना अधिकृतपणे महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘प्लेअर्स अननोन बॅटलग्राऊंडची (पबजी) निर्माती असलेली पबजी कॉर्पोरेशन भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची घोषणा करत आहे,’ असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

पबजी मोबाईल इंडियाची निर्मिती खास भारतासाठी करण्यात आली आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. वापरकर्त्यांसोबत अधिक उत्तम पद्धतीनं संवाद साधला जावा यासाठी कंपनी भारतात एक सबसिडरी तयार करेल. त्यासाठी भारतातील पबजी कंपनी १०० जणांची टीम तयार करेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

पबजी कॉर्पोरेशनची मालकी असलेली क्राफ्टॉन भारतात १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स, मनोरंजन आणि आयटी उद्योगात कंपनी प्रामुख्यानं गुंतवणूक करेल, असं कंपनीनं सांगितलं आहे. दक्षिण कोरियन कंपनीकडून करण्यात येणारी ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल, असा कंपनीचा दावा आहे.

Protected Content