पत्रा चाळ घोटाळा : राऊत यांच्या सहभागाची चौकशी करा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात खा.संजय राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ईडीने खा.राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

 

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, खा.राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने खा.राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे. खा. राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही श्री. सोमय्या यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अतुल शाह उपस्थित होते.

Protected Content