जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोर्टात सुरू असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून पत्नीवर चाकू हल्ला करून मारहाण करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधिश जे.जे. मोहिते यांनी पाच वर्षाची सक्त मजूरी आणि दंडाची शिक्षा शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे. मनोज आत्माराम देसले रा. जळगाव असे आरोपी पतीचे नाव आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, धरणगाव तालुक्यातील भोद येथील विवाहिता सुवर्णा मनोज देसले यांचा आणि पती मनोज देसले यांच्या कौटुंबिक वाद सुरू होता. विवाहितेने पती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या रागातून पती मनोज देसले, नंदोई भाऊ विनोद गोकूळ खैरनार, लहान सासरे राजेंद्र रायभान देसले, चुलत दिर बंटी राजेंद्र देसले, दीर दिपक आत्माराम देसले, शेतात काम करणारे लोटन निंबा पाटील, निंबा पाटील, सासू अरूणाबाई आत्माराम देसले हे २९ ऑक्टोबर २०१८ रोजी विवाहितेच्या आईच्या घरी आले. त्यावेळी विवाहितेचा मुलगा कौस्तूभ (वय-८) व विवाहितेची आई घरीच होत्या. पोलीसात दाखल केलेली केस मागे घेण्याच्य कारणावरून पती मनोज देसले याने चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला होता. तर इतरांनी मारहाण करून शिवीगाळ केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला जळगाव न्यायालयातील न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात १३ साक्षीदरांची साक्ष नोंदविण्यात आली. यात विवाहितेसह तिचा मुलगा कौस्तूभ आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने पती मनोज देसले याला दोषी ठरवत पाच वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा आणि १० हजारांची दंड ठोठावला. दंडातील ५ हजारांची रक्कम विवाहितेला देण्याचे आदेश दिले आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद केला.