पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या घराजवळून सुमारे ३० मीटर अंतरावर घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेस चिट्ठी दाखवत एकाने गळ्यातील १३ ग्रॅम सोन्याची पोत ओढून दोन युवक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर पसार झाले. महिलेने धाडस करून चोरट्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ अर्धा फूट अंतर राहिल्याने चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पाचोऱ्यात रुजू झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या कारकिर्दीतील ही पहिली घटना असल्याने त्यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे. पाचोरा शहरातील चिंतामणी कॉलनी जवळील पवन नगर भागात राहात असलेल्या चेतना अशोक पवार (वय – ३७) ही महिला सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान आपल्या मुलीची ट्युशन फी भरून घरी परत जात असतांना भडगांव रोडवरील चिंतामणी कॉलनीत आमदार किशोर पाटील यांच्या घराजवळील सुमारे ३० मीटर अंतरावर काळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्याची रंगाची टोपी परिधान केलेला युवक काळ्या रंगाचा विना क्रमांक असलेल्या अपाचे मोटरसायकल वर बसून होता. तर त्याचा पिवळ्या रंगाचा शर्ट व तोंडावर पांढरा रुमाल बांधलेला युवक काही अंतरावर उभे राहून चेतना पवार या महिलेस हातातील चिठ्ठी देऊन हा पत्ता कुठला आहे असे विचारून महिलेच्या हातात चिठ्ठी दिली. चिठ्ठी वाचत असतानाच तिच्या गळ्यातील १३ ग्रॅमची सोन्याची पोत ओढून जवळ उभे असलेल्या मोटरसायकलवर बसून दोघे युवक पसार झाले. दरम्यान ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिने मागील युवकाची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात केवळ अर्धा फूट अंतर असल्याने चोरटे पसार झाले. याच वेळी महिलेने आरडाओरड केल्यानंतर चिंतामणी कॉलनीतील सचिन पाटील याने महिलेस आपल्या मोटरसायकलवर बसवून तर जवळच राहत असलेले मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भरधाव वेगाने मोटरसायकलवर पसार झाले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, हवालदार नितीन सूर्यवंशी, राहुल सोनवणे, राहुल बेहरे, किरण पाटील यांनी पाहणी करून महिलेची विचारपूस केली व आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटेज चेक केले. मात्र चोरटे अतिशय भरधाव वेगाने पसार झाल्याने चित्रावरून चेहरे लक्षात येणे कठीण जात आहे.

Protected Content