मुंबई (वृत्तसंस्था) राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कोरोनिल औषधाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘पतंजलीने क्लिनिकल ट्रायल घेतल्या की नाही हे जयपूरची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस शोधून काढेल. नाही तर अशा खोट्या औषधाची विक्री महाराष्ट्रात करू दिली जाणार नाही’ असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असे सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठाने हे औषध तयार केले असून मंगळवारी ते लाँच करण्यात आले. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती. दरम्यान, जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या ट्विटमध्ये लोकांच्या आयुष्याशी खेळ नको, अशा आशयाचा हॅशटॅग वापरला आहे.