यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीच्या काळात सर्वांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र आल्यास आपण याचा यशस्वीपणे प्रतिकार करू शकतो असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. ते कोरोबाबत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
यावल येथील तहसील कार्यालयात आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या संदर्भात शासकीय नियमांचे काटेकोर पालन व त्यावर उपाय योजना यासाठी यावल तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवि सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक नितीन वेंकट चौधरी, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, भाजपाचे डॉ नरेंद्र कोल्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, शिवसेनेचे पप्पू जोशी, राष्ट्रवादीच्या द्वारकाबाई पाटील आदी पदधिकारी या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना आमदार शिरीषदादा चौधरी म्हणाले की, यावल प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या या संकट काळात आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची कशा प्रकारे काटेकोर अंमलबजावणी करता येईल याची दखल आपण सर्वांनी पक्षीय आणि व्यक्तिगत मतभेद विसरून संयुक्तिक जबाबदारीने पार पाडल्यास आपण नक्कीच कोरोनावर उपचाराच्या माध्यमातून यश मिळवू असे ते म्हणाले. तर, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विशेष करून ग्रामीण भागात सातत्याने कोरोना संसर्ग बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही अत्यंत चिंतेची व गंभीर बाब असून आपली व आपल्या कुटुंबाची चिंता वाढवणारी असल्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सांगितले. याप्रसंगी फैजपूर कारखान्याच्या परिसरात असलेल्या जेटीएम कॉलेजवर कोरोना रुग्णांसाठी कोविंड कक्ष उभारणीस आपली जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शरद महाजन यांचे आभार मानून विशेष कौतुक करण्यात आले. बैठकीस उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी मानले.