जळगाव : प्रतिनिधी । वरिष्ठ नेते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष निष्क्रिय असतील तर एनएसयुआय जिल्हाध्यक्षांनी पुढे येऊन पक्षाचे काम हाती घ्यावे..पक्षामध्ये काम करणाऱ्यांची किंमत राहणार आहे, निष्क्रिय लोकांची पक्षालासुद्धा गरज नाही अशी सक्त ताकीद एनएसयुआय प्रभारी तथा कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी दिली आहे
प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व एनएसयूआय जिल्हा अध्यक्षांची बैठक दूरदृष्यं प्रणालीद्वारे आयोजित केली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले होते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , एन एस यु आय व युवक काँग्रेसचे प्रभारी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यासह व सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
तीन तासांच्या या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या एन एस यु आय जिल्हाध्यक्षांकडून संघटनेच्या कार्याबद्दल आढावा घेण्यात आला व भविष्यामध्ये एन एस यु आयला पक्षाकडून काय अपेक्षा आहेत? सध्या जिल्हाध्यक्षाला काम करताना कुठल्या अडचणी येत आहेत? याबद्दलच्या सर्व सूचना प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी जाणून घेतल्या.
जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्ह्यामध्ये एनएसयुआयच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा अहवाल सादर केला. एखाद्या विद्यापीठाने जिल्हाध्यक्षावर दाखल केलेला एक कोटी अब्रुनुकसानीचा दावा व नंतर वेळोवेळी विद्यापीठाचे भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणून कुलगुरूसारख्या व्यक्तीला नैतिकता तपासण्याची वेळ आणत स्वतःहून राजीनामा देण्याची घटना ही केवळ एनएसयुआयच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली असे मराठे म्हणाले .
विद्यापीठांमधील संघ विचारधारेच्या व मागील दाराने नियुक्त झालेल्या व्यक्तींना पदापासून दूर करेपर्यंत जिल्हाध्यक्षांचा लढा हा विद्यापीठाशी सुरूच राहील. अशीसुद्धा ग्वाही जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली. या कामगिरीबद्दल कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी मराठे यांचे कौतुक केले.
कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या कामांची दखल घेत “जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते, पदाधिकारी तुमच्या कामाची दखल घेत नसतील व स्वतःही निष्क्रिय असतील तर तुम्ही पुढे यावं व पक्षाचे काम हाती घ्यावे अशा सूचना केल्या.
बैठकीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आ नाना पटोले यांनी एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना सूचना केली की पक्षाचे काम करताना सध्याच्या कोरोणाच्या कठीण काळामध्ये स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊनच संघटनेचे काम करा. येणारा काळ कठीण आहे नागरिकांना आवश्यक ती मदत काँग्रेस पक्षाच्या व संघटनेच्या वतीने करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा..बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदेश एनएसयूआयचे सोशल मीडिया अध्यक्ष अभिजीत हळदेकर यांनी केले.