नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातली कोरोनाची परिस्थिती आता बिकट होत चालली असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर आरोप केला आहे. हे दोघे त्यांची जबाबदारी नाकारत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली. या माहितीनुसार, देशात एका दिवसात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यानंतर चिदंबरम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, “महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लसींचा अपुरा पुरवठा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाहीये आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.”
“१८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या कोणालाही लस मिळत नाही. इतर राज्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरु आहे”.