इस्लामाबाद वृत्तसंस्था । भारताच्या फाळणीसाठी अनेक तर्क आणि दावे केले जातात. इतकंच नव्हे तर देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे आग्रही होते आणि त्यासाठी फाळणी झाली तरी चालेल, अशी त्यांची भूमिका होती, असा तर्क दिला जातो. मात्र, फाळणीसाठी मोहम्मद अली जिना यांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचा पाकिस्तानी वंशाचे राज्यशास्त्राचे संशोधक इश्तियाक अहमद यांनी दावा केला आहे.
इश्तियाक अहमद यांनी आपल्या ‘Jinnah: His Successes, Failures and Role in History’या पुस्तकात फाळणीबाबतची माहिती दिली आहे. भारताची फाळणी होऊ नये यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष आग्रही होते. मात्र, मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना हे फाळणीवर अडून बसले होते. जिना यांनी काँग्रेसला हिंदूचा पक्ष, तर महात्मा गांधी यांना ‘हुकूमशहा’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी एकही संधी गमावली नाही.
इश्तियाक यांनी सांगितले की, २२ मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये मोहम्मद अली जिना यांनी अध्यक्षीय भाषण दिले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी ठराव मंजूर करण्यात आला. या दिवसानंतर जिना अथवा मुस्लिम लीग यांनी एकदाही अखंड भारताचा स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्यावेळी फेडरल व्यवस्था अतिशय कमकुवत होती आणि मोठ्या प्रमाणावर ताकद ही प्रांतीय सरकारांच्या हाती एकवटलेली होती.
इश्तियाक यांच्या या दाव्यानंतर पाकिस्तानी-अमेरिकन इतिहासकार आयेशा जलाल यांच्या थेरीला आव्हान मिळाले आहे. जिना यांनी सत्ता वाटपाबाबत काँग्रेससोबत करार करण्याबाबत भूमिका बजावली असल्याते प्रा. जलाल यांची थेरी होती. १९८० पर्यंत या थेरीला काहींनी मान्यतादेखील दिली होती. इश्तियाक यांनी प्रा. जलाल यांच्या उलट दावा केला आहे. जिना यांची बरीचशी भाषणे, वक्तव्ये, निवेदनांतून भारताची फाळणी करून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ते आग्रही असल्याचे इश्तियाक यांनी म्हटले आहे. त्याशिवाय, ब्रिटनही फाळणीसाठी राजी झाला. त्यामागे त्यांचा स्वार्थ असल्याचे इश्तियाक यांनी म्हटले. काँग्रेसच्या नेतृत्वातील अखंड भारत हा ब्रिटीशांच्या अजेंड्याला पूर्ण करू शकत नाही. मात्र, मुस्लिम लीगच्या नेतृत्वात पाकिस्तानची निर्मिती झाल्यास त्याचा फायदा ब्रिटीशांना होणार होता.
इश्तियाक यांनी ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर डॉक्युमेंट्स’सारख्या स्रोतांच्या आधारे हा दावा केला आहे. अखंड भारत हा सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वातील गटात सहभागी होईल अशी भीती ब्रिटीशांना होती. मोहम्मद अली जिना हे फक्त मुस्लिमांसाठी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही नव्हते. तर, शीख आणि द्राविडींसाठीदेखील वेगळ्या राष्ट्राची निर्मिती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. मोहम्मद अली जिना यांना धर्मनिरपेक्ष पाकिस्तानची निर्मिती करायची होती, हा दावादेखील इश्तियाक यांनी फेटाळून लावला.
दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक असणार याची जाणीव मु्स्लिम लीगला होती. भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांना त्रास दिला तर, पाकिस्तानमध्येही हिंदूना त्रास देता येईल असा त्यांचा होरा होता. जिना यांना ३० मार्च १९४१ रोजी भारतातील मुस्लिमांबाबत विचारले असता, सात कोटी मुस्लिमांना स्वतंत्र करण्यासाठी दोन कोटी मुस्लिमांना शहीद करण्यास तयार असल्याचे उत्तर त्यांनी दिले होते. त्यावेळी भारतात साडे तीन कोटी मुस्लिम राहत होते.
इश्तियाक यांनी सांगितले की, १९३७ नंतर मोहम्मद अली जिना हे मुस्लिम राष्ट्रवादी झाले. हिंदू आणि मुस्लिमांसाठी दोन राष्ट्र असल्याचे ते मानत होते. हे दोन्ही देश कधीही एकत्र राहू शकत नाही असे त्यांना वाटत होते. लखनऊमध्ये १९३६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जमिनदारी व्यवस्था नष्ट करण्याबाबतचे एक भाषण केले होते. त्यांच्या या भाषणानंतर मुस्लिम जमिनदारांना मोठा धक्का बसला होता. काँग्रेसने त्यावेळी मुस्लिम लीगच्या नेत्यांना प्रांतीय सरकारमध्ये सहभागी करण्यास नकार दिला होता. त्याचा फायदाही जिना यांनी मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्यासाठी केला होता असा दावा इश्तियाक यांनी केला आहे.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिना यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली. मुस्लिमांमध्ये अनेक समुदाय होते. त्यांच्यातही वाद होते. १९५० मध्ये अहमदियांबाबत वाद निर्माण झाला. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांना मुस्लिम नसल्याचे घोषित करण्यात आले. जनरल जिया उल-हक यांच्या कार्यकाळात शिया-सुन्नी पंथामध्ये वाद सुरू झाला होता.