मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील पंचायत समिती कार्यालयातील विविध विभागांमध्ये कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने लाभार्थ्यांना खाली हात परतावे लागत आहे. यापुढे जर लाभार्थी खाली हात गेल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की , तालुक्यातून बरेच लाभार्थी कामासाठी सबंधित विभागाच्या टेबलावर येतात. मात्र बऱ्याच वेळी त्याच्या हाती निराशाच येते. समाज कल्याण विभाग, ग्राम.पंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग येथे ,पंखे फिरत असतात, परंतु अधिकारी कर्मचारी गैरहजर राहतात. हे अधिकारी,कर्मचारी सतत घरी,चहा, नास्त्यासाठी बाहेरच फिरतात. हवालदिल परिस्थिती पंचायत समितीत निदर्शनात आले आहे. २१ जानेवारीला दुपारच्या वेळेस भोई स्वतः लाभार्थ्यांच्या मदतीसाठी गेले असता अक्षरशः संबंधित विभागाचे दरवाजे बंद अवस्थेत दिसले. यावेळी कोण कुठे गेले याची पूर्णतः माहिती कोणालाही नव्हती. त्याचे संबधित विभागाचे भोई यांनी चित्रीकरण सुद्धा केले आहे. खेड्यापाड्यातून येणारे नागरिकांचा खर्च अधिक रोज वाया जातो. यापुढे जर कोणी अधिकारी, कर्मचारी शासकीय कामा व्यतिरिक्त आपल्या खासगी कामांसाठी कार्यालयाच्या बाहेर फिरत असेल तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी दिला आहे. याप्रसंगी अरुण नागरुत, सुनील कोळी, उपाध्यक्ष श्रीराम भोई, किशोर भोई, उपसरपंच गोपाळ इंगळे दी मनसे सैनिक उपस्थित होते.