चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पंचक येथे मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, रोकड आणि दोन मोबाईल यासह इतर मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरी करतांना घरात झोपलेल्या तरूणीला जाग आल्यानंतर चोरटे पसार झाले.
विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील पंचक येथील रहिवासी आकाश मनोहर पाटील हे आपल्या आई लताबाई आणि बहीण आरती यांच्यासह वास्तव्याला आहे. दरम्यान आकाश मावशीकडे गावाला गेला होता. त्यामुळे घरात त्यांची आई लताबाई पाटील आणि बहिण आरती पाटील घरात होत्या. सोमवार ९ मे रोजी आई व मुलगी यांनी जेवण करून घराला आतून कडी लावून झोपलेल्या होत्या. १० मे रोजी ४.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, ९४ हजाराची रोकड, देव्हाऱ्यात ठेवलेले चांदीचे देव आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला.
मोबाईल चोरतांना तरूणीला आली जाग
दरम्यान आरतीने तिचा मोबाईल झोपतांना चाजिंग लावून उशीजवळ ठेवला होता. घरातील चोरी केल्या नंतर चोरटा हा आरतीचा मोबाईल लांबविण्याचा प्रयत्नात असताना मोबाइलला चार्जरची वायर लावलेली होती. मोबाइल ओढताच चार्जच्या वायरमुळे आरतीला तात्काळ जाग आली. सुरुवातीला तिला वाटले की, भाऊ आकाश आला असे आई लता यांना सांगितले. परंतु आकाश गावाला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नेमका हा कोण असे आईला सांगितल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली हे पाहून चोरटा पसार झाला.
अडावद पोलीसांची घटनास्थळी धाव
यावेळी गल्लीतील ग्रामस्थ यांनी धाव घेऊन घाबरलेल्या लताबाई यांना धीर दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह सुनिल तायडे, जयदिप राजपुत, पंचक गावाचे पोलिस पाटील सतीश वाघ असे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वानपथक बोलून चौकशीला सुरुवात केली आहे. घरापासून जवळ असलेल्या शेतात देव्हाऱ्यातील असलेला लाल कपडा आढळून आला. या घटनेचा पुढील तपास आडावद पोलीस कर्मचारी करीत आहे.