औरंगाबाद प्रतिनिधी । मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचे निराकरण व्हावे या मागणीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमातून मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन छेडण्याची माहिती दिली होती. यात त्यांनी स्वातंत्र्य दिनानंतर उपोषण करण्याचे संकेतदेखील दिले होते. या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजेपासून पंकजा मुंडे यांनी विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान, या एक दिवशीय उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत.