जामनेर, प्रतिनिधी । राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या काँग्रेस नेत्या ज्योत्स्ना विसपुतेंनी मुख्यमंत्री.ना.उद्धव ठाकरेंना लिहीले जळजळीत पत्र …वाचा त्यांच्याच शब्दात
आदरणीय मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब नमस्कार..
मी ,ग्रामीण महाराष्ट्रातील एक कुटुंबवत्सल गृहिणी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. कृपया नक्की स्वतः ला काही प्रश्न विचारून ऐतिहासिक निर्णय घ्याल ही विनंती आहे……
साहेब,कोरोनाच्या या संकटात काही सामाजिक संकट आलीत. त्यातीलच कौटुंबिक हिंसा हा प्रश्न चर्चेत आला व वास्तवता कळली.
यातच आता रीतसर दारूची परवानगी मिळाली. काही TV CHANNELS या दारू पिणाऱ्या निर्लज्ज लोकांच्या मुलाखती दाखवीत होते. मुलाखती देणारे मद्यपी या अविर्भावात बोलत होते की त्यांनी खूप मोठे युद्ध केले व त्यांची आरती केली पाहिजे..
राज्याच्या महसूल चा प्रश्न आहे परंतु इतर स्रोत शोधले पाहिजे. सामाजिक शोषण करणारी उकल काय कामाची??जर आपण रांगा पाहिल्या तर तरुण मुले त्या रांगेत जास्त दिसतात. हेच का ते राष्ट्रीय आधार..??? साहेब पूर्वी तरुण, बापाच्या पैश्याने चोरून दारू प्यायचा. आता रीतसर पितो.. साहेब ,दारूचे दुःख कुटुंबातील लोकांना विचारा.. ज्या आईचा तरुण पोरगा सकाळी सुद्धा दारूत झिंगत येतो व दिवसभर दारूत झोपतो त्या विधवा माऊलीने काय करायचे?वेळ प्रसंगी घरात मारहाण, वस्तू गहाण ठेवणे, मित्रांना रात्री अपरात्री, जाणीवपूर्वक घरी आणणारे दारुडे स्वतः मरतात व लेकराबाळांना सुद्धा दुःखाच्या खाईत लोटतात.
मुळातच या काळात आर्थिक व मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होत आहे. त्यात त्यांना नशेच्या आहारी नेऊन काय मिळणार??महसूल बुडला तर आपण गरीब होऊ इतकेचना??गावाकडील कोणत्याही महिलेस विचारले की दारू पिऊन मिळणारी श्रीमंती पाहिजे कि झोपडित राहून दोन घास सुखाचे?तर ती दुसराच पर्याय स्वीकारेल.तिला घरात आनंद व शांतता हवी आहे.. साहेब महिलांना तर हा काळ अतिशय कठीण आहे.. आतापर्यंत तणाव व आतातर हक्काची मारहाण??
साहेब,मोठ्या शहरात ,मोठे लोक,मोठा पैसा त्यांनाच फक्त दारू पिऊ द्या.ज्या घरांमध्ये दारू करिता FAMILY GET TOGETHER होते त्यांना त्यांची दारू लखलाभ हो.. परंतु ज्या लोकांकडे केशरी व पिवळे रेशन कार्ड (BPL) असून सवलतीच्या दरात धान्य देत आहात त्यांना दारू घेण्याची परवानगी मिळू नये.. कारण हे आर्थिक दृष्टया दुर्बल आहेत व राज्याने यांना धान्य देण्याकरिता भरपूर आर्थिक झळ सोसलेली आहे.. व कुटुंबप्रमुख या नात्याने आपण काळजी घेत आहात.. प्रत्येक वस्तू वितरण प्रक्रियेत आपले नियम आहेत ना ??तर दारू वितरण होतांना सुद्धा नियम पाहिजे..कमीत कमी LOKDOWN च्या काळात तरी.. आजही ग्रामिण भागातील आमच्या रणरागिणी दारूच्या अवैध भट्टया उजाड करण्याकरिता गावगुंडांसोबत युद्ध करीत आहेत,लढत आहेत. का??
साहेब,मागील दोन दिवसांपासून दारूला जे अप्रत्यक्ष समर्थन मिळत आहे ते नक्कीच भविष्यकाळातील येणाऱ्या पिढयांना उध्वस्त होण्याची नांदी आहे हे नक्की.. राज्याचा महसूल वाढवायचा असेल तर भ्रष्टाचारबंदी व्हावी,शेतीमालावर आधारित गृहउद्योग उभारावेत, गडगंज संपत्ती असेल तर कोट्यवधी रुपयांची त्यांनी घेतलेली कर्ज सक्तीने वसूल करावेत…आर्थिक महसूल वाढीकरिता दारू विक्री व दारू पिणे हा जालीम इलाज होऊच शकत नाही..मुळातच नोकरभरती नाही ,बेरोजगार युवक व युवती आतून मानसिकदृष्ट्या पोखरून निघाले आहेत..मदिरेच्या नादी लागलेल्या या अधाशी लोकांच्या रांगा पाहून जे दारू पित नाहीत त्यांचेही पाय तिकडे वळतील की काय अशी भीती वाटते..
साहेब, राज्याच्या तरुणाला हाताला काम द्या. आपोआप उत्पादन वाढेल व आर्थिक क्रांती होईल.. चुकनही नोकरभरती थांबवू नका.. दोन पैसे कमी मानधन द्या पण काम द्या.तरुण युवक युवती जर मानसिक दृष्ट्या अपंग झाले,व निराशेच्या गर्तेत गेले तर दारूचा धंदा तेजीत चालेल परंतु राज्याची दिशा व दशा बदलेल.शास्त्रीय दृष्टया ते अल्कोहोल आहे.रासायनिक गुणधर्म ते दाखविणारच.मद्याच्या पेल्यात बुडणाऱ्यांकडून राष्ट्र उभारणीचे स्वप्न मृगजळासारखे.
साहेब, मी एक शिक्षिका देखील आहे. आजची पिढी प्रत्येक गोष्ट चांगली किंवा वाईट झपाट्याने आत्मसात करीत आहे.म्हणून खरी काळजी वाटते. नकारात्मकच चित्र आहे असे नाही.. सकारात्मक सुद्धा आहे. ते टिकवून आपल्याला खूप खूप पुढे जायचे..दारू पिऊन अघोरी मार्गाने नाही तर वैचारिक उंची वाढवून शिखर गाठायचे.कृपया नव्या इतिहासाच्या नांदी ला नक्की न्याय मिळेल ही अपेक्षा व हट्ट..
आपली आज्ञाधारक,
ज्योत्स्ना विसपुते. माजी राज्य महिला आयोग सदस्य,
तालूका जामनेर जिल्हा जळगाव..
(MOBILE NUMBER..9421521702)
MAHARASHTRA