जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय रेल्वे सेवेत नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत तरूणाची फसवणूकीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी २६ फेब्रुवारी रेाजी सकाळी १० वाजता नाशिक येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला एरंडोल पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. मुकुंद बापू मोरे रा. चाळीसगाव अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकुंद मोरे हा जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार असलेल्या तरूणांना हेरून रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत पैसे घेत होता. परंतू नोकरी न लागल्याने दिलेल्या व्यक्तीने पैशांचा तगादा लावल्याने मुकुंद मोरे याने धनादेश दिला. परंतू धनादेश देखील बाऊन्स झाला. या फसवणूकीच्या प्रकरणी मुकुंदच्या विरोधात सन २०२१ मध्ये एरंडोल पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुकुंद हा फरार झाला होता. दरम्यान, संशयित आरोपी हा नाशिक शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.त्यानुसार पथकाने कारवाई करण्यासाठी पथकाला नाशिकला रवाना केले. रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पथकाने नाशिक बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित आरोपी मुंकुंद बापूर मोरे याला अटक केली. पुढील चौकशीसाठी संशयित आरोपी मुकुंद मोरे याला एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.