जळगाव प्रतिनिधी । अवकाळी पावसामुळे आज भडगाव तालुक्यातील गावामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
आज दुपारी जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बातसर, लोण पिराचे या गावात झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री महाजन यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेल्या असताना हातातोंडाशी आलेल्या पीकाचे वादळी वा-याने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे या भावनेने पालकमंत्री महाजन यांनी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. ढाकणे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना दिले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पाचोरा प्रांताधिकारी यांनी विशेष पथके नेमले असून या पथकांमार्फत उद्या सकाळीच (12 जून रोजी ) नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.
वादळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत, भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.