नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी)  जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागास आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या त्या गावांतील नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले.

 

याप्रसंगी पालकमंत्र्यासमवेत उप विभागीय अधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, तालुका कृषि अधिकारी सचिन बऱ्हाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष राऊत यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र चव्हाण, भरत बोरसे, मुरलीधर पाटील यांच्यासह पं स सदस्य, विविध गांवाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, गहू, मका, बाजरी व भाजीपाला आदि पिकांचे नुकसान झाले असून वीजेचे खांब, तारा तसेच वृक्ष उन्मळून पडल्यामुळे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गुरे मेलेली आहेत. या अवकाळी पावसाचा तापी काठावरील गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल पालकमंत्री यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेशी चर्चा करुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी आज सकाळीच जळगाव तालुक्यातील भोकर, भादली, नांद्रा, पिलखेड, सावखेडा, कठोरा,नंदगाव, किनोद आदि गावांना भेट देऊन या गावांतील शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच त्यांचेशी चर्चा करुन नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली. व यंत्रणेला नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेशही दिले.

 

त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये वीजेचे खांब वाकले असून तारा तुटल्याने गावातील वीज पुरवठा बंद आहे. तुटलेल्या तारांची दुरुस्ती लवकरात लवकर करुन वीज पुरवठा सुरु करावा. तसेच रस्त्यांवर उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिलेत. तसेच पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन आपल्या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची व पिकांची माहिती घेतली. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करुन शासनास नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल. व जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करु. असेही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना सांगितले व त्यांना धीर दिला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीकांचा पीक विमा काढलेल्या आहे. अशा शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरुन 48 तासाच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

Protected Content