मुक्ताईनगर प्रतिनिधी । केळी पिकावर गेल्या काही दिवसांपासून सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली असून हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत.
शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील शेती बांधावर जाऊन केळी पिकाची पाहणी केली. कृषी मंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्याची मागणी केली होती. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरू असलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीला बैठकीत या मागणीवर विचार करण्यात आला आहे. कृषी मंत्री दादा भुसे व कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांना यंत्रणेकडून तत्काळ पंचनामे करत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.