मुक्ताईनगर : प्रतिनिधी । तालुक्यात ग्रामपंचायतींवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपनेही आपापल्या परीने दावे केले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरात ग्रामपंचायती ५१ असताना दाव्या-प्रतिदाव्यांमुळे बेरीज मात्र ९० वर गेली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे. तर ३५ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. भाजपने १२ ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र निवडणूक ५१ ग्रामपंचायतींसाठी झाली होती. दावे-प्रतिदावे यांच्यामुळे एकूण गणती 90 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सरपंचपदाची निवड झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरस अपेक्षित होती. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरही भाजप चांगल्या स्थितीत असल्याचा दावा उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. तर राष्ट्रवादीने आपली ताकद वाढण्याचा विश्वास व्यक्त केला होता.
मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालावेळी खडसे कुटुंबात गृहयुद्ध पाहायला मिळालं. कारण कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी केला होता. ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची होती. यामध्ये दोन जागा बिनविरोध होत्या . त्यामुळे नऊपैकी ५ याठिकाणी शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा उमेदवार आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे.
कोथळीत ९ पैकी ६ जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडून भाजपकडे गेल्या आहेत. सत्तांतरामुळे सूनबाईंनी सासरेबुवांना धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्याकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत.
“या निवडणुकीत झालेल्या राजकीय बदलामुळे मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले आहे” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात, एकाच घरात राहूनही सून रक्षा खडसे भाजपमध्ये तर एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे खेवलकर राष्ट्रवादीत अशी स्थिती पाहायला मिळत आहे.