नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका आज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता मुकेशला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आहे. तिहार तुरुंगात या चौघांना फाशी दिली जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपींकडून शिक्षेची तारीख लांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाने आज मुकेशची याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेविरोधात दाद मागण्याचे त्याचे सर्व कायदेशीर प्रयत्न संपुष्टात आले आहेत. यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळत राष्ट्रपतींच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही फाशी देण्यात येणार असून फाशी टाळण्यासाठी दोषींची विविध मार्गांनी धडपड सुरू आहे.