शेंदूर्णी, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी भागवत पुंडलिक खोडपे यांचे द्वितीय चिरंजीव राजेंद्र व विष्णू कौतिक पाटील यांची कन्या सविता यांचा विवाह आज मंगळवार ९ जून रोजी शासनाच्या निर्देशाचे पालन करत ४० नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला
भागवत खोडपे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचा मित्र परिवार व नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. अश्या परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीत मुलाचा विवाह करणे शक्य नव्हते. पण वधू वर पक्षांनी मिळून एकत्रित निर्णय घेऊन वधू पक्षाकडून केवळ १० नातेवाईक व वर पक्षाकडून १० नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आले होते. तर मित्र परिवारातील २० लोक उपस्थित होते. नेरी येथे भागवत खोडपे यांच्या स्वतःच्या घरासमोर हा विवाह संपन्न झाला. सर्व नातेवाईकांनी संदेश पाठवून लग्नाला हजर न राहता व्हाट्सएपच्या माध्यमातून वधू वरांना आशीर्वाद देऊन उपकृत केले. आजच्या परिस्थितीत जुळलेले विवाह करण्यासाठी वधू व वर पक्षाला तारेवरची कसरत करावी लागत असतांना सर्व नातेवाईकांना विश्वासात घेऊन आदर्श विवाह पार पाडणे मोठी कामगिरी आहे त्यासाठी समाजातून वधू वर पित्यांचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. उपस्थित नातेवाईक व मित्र परिवार यांना मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.