नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नियंत्रण रेषेसंदर्भात कोणताही बदल भारताला मान्य नाही हे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केले तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊन मोठा संघर्ष सुद्धा होऊ शकतो असा त्यांनी इशारा दिला.
भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्समध्ये आज आठव्या फेरीची चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लडाख सीमेवरील स्थिती संदर्भात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
“एकूण सुरक्षा स्थिती लक्षात घेतली, तर चीन बरोबर मोठे युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. पण सीमेवरील संघर्ष, घुसखोरी आणि चिथावणीखोर लष्करी कृतीमुळे एक मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही” असे जनरल रावत म्हणाले. नवी दिल्लीतल नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
“पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दुस्साहस करणाऱ्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागतेय” असे रावत म्हणाले. मे महिन्यापासून सुरु झालेली ही संघर्षाची स्थिती अजूनही कायम आहे. “आमची तैनाती एकदम स्पष्ट आहे. जैसे थे ती स्थिती कायम झाली पाहिजे. नियंत्रण रेषेमध्ये कुठलाही बदल आम्ही मान्य करणार नाही” असे रावत यांनी सांगितले.
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत सात फेऱ्यांची चर्चा झालीय. पण अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. दोन फेऱ्यांच्या चर्चामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधीही सहभागी होते. चीनकडून पाकिस्तानला जे पाठबळ दिले जाते, त्याचाही रावत यांनी उल्लेख केला. भारतासमोर चीन आणि पाकिस्तान दोघांचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.