नायगाव येथे श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथे श्रीराम दरबार व देवदेवतांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळा शनिवार दि. २ ते सोमवार दि. ११ एप्रिल २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ६ काकड आरती व भजन, सायंकाळी हरिपाठ, सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शनिवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी होम यज्ञ पूजा करण्यात येणार तर दुपारी देवदेवतांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार दि. ३ एप्रिल रोजी सर्व देवदेवतांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत संगीतमय श्रीराम कथेस प्रारंभ, रामकथा महात्म्य, शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ ते ९ एप्रिल दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्रीराम जन्माचे हभप रामानंदचार्य ज्ञानेश्वर महाराज महाले (नांदुरा) यांचे कीर्तन सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत असणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर सायंकाळी हभप रघुनाथ महाराज यांचे भारुड होणार आहे. सोमवार ११ एप्रिल रोजी हभप नितीन महाराज मलकापूर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

Protected Content