मुंबई: वृत्तसंस्था । ‘एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचं पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते तिथेच राहतील,’ असं ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केलं.
खडसे हे राष्ट्रवादीमध्ये येणार हे निश्चित होताच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका मंत्र्याला पद सोडावं लागणार, अशी चर्चा होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नावे घेतली जात होती.
शरद पवार यांनी आज या सगळ्या गोष्टींवर खुलासा केला. ते म्हणाले, ‘पक्ष प्रवेशाच्या आधी खडसे यांची पक्षातील अनेक नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर माझ्याशीही चर्चा झाली. यातील कुठल्याही चर्चेत त्यांनी एका शब्दानेही कशाचीही अपेक्षा केली नाही. माध्यमांनी मात्र अनेक प्रकारच्या बातम्या दिल्या. त्याला काहीही अर्थ नाही. पवारांच्या या वक्तव्यामुळं खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय मिळणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
खडसेंच्या पक्ष प्रवेशाला अजित पवार उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शरद पवारांनी त्याचेही खंडन केले. ‘मीडियामध्ये लोक परस्पर काहीतरी जाहीर करून टाकतात. मला आश्चर्य वाटतं. कोरोनाच्या काळात आमच्यातील अनेकांना त्रास झाला. त्यामुळं खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना दिल्या आहेत. त्यातून एखादा सहकारी इथे नसेल तर गडबड आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे,’ असंही पवार म्हणाले.