नागरी सुविधांच्या मागणीसाठी नागरीक आक्रमक

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मीलगेट परिसरात नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीसाठी या भागातील रहिवाशांनी पालिकेत धडक दिली.

शहरातील प्रभाग क्रमांक ३मधील मीलगेट परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. या त्रस्त रहिवाशांनी गुरुवारी प्रशासनाकडे आपल्या समस्या सोडविण्याची मागणी केली. शहरातील प्रभाग क्रमांक ३मधील मीलगेट परिसरातील रहिवासी अनेक वर्षांपासून तेथे राहत असून त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधांचा लाभ झालेला नाही. रस्ते नसल्याने तसेच जागोजागी खड्डे झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या भागात सार्वजनिक शौचालय, गटारी नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होवून साथीचे आजार परिसरात उद्भवत आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रारी करून ही दखल घेतली गेली नाही, अशी तक्रार या महिलांनी केली.
उप मुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांनी या महिलांचे म्हणणे ऐकुण घेत त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

Protected Content