जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील रेल्वेच्या अतिक्रमण जागेतून काढण्यात आलेल्या झोपडपट्टी वसाहतीत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी स्थानिक रहिवाशी यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाच वर्षांपूर्वी भुसावळ येथील रेल्वे हद्दीत काढण्यात आलेल्या अतिक्रमणात उध्वस्त झालेल्या नागरिकांनी न्याय व हक्कासाठी उपोषण केले होते. त्यावेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी यावल रोडवरील यशवंत नगर येथे महावितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या मागे वास्तव्याला जागा दिली होती. परंतु या ठिकाणी गटारी, वीज, पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छालय तसेच जागेवर घर कमिटी लावणे, ८/१२ चा उतारा लावणे यासह इतर सुविधा उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मोठे त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी एकूण ८५ परिवार वास्तव्याला असून त्यांना अद्यापपर्यंत मूलभूत सुविधा मिळालेली नाही. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हा प्रशासनाने याची चौकशी करून येथील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशी महिला यांनी मंगळवारी ३० मे रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देऊन केले आहे. याप्रसंगी मथुराबाई पवार, गंगाबाई बागुल, सायरा लेले, राहुल पवार, राजीव तायडे, समाधान पवार यांच्या स्थानिक महिला उपस्थित होते.